कोल्हापूर : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचा ई-मेल बुधवारी (दि. १९) रोजी तिला प्राप्त झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच करवीरनगरीतील क्रीडारसिकांंकडून आनंदाची पुन्हा एकदा लाट पसरली आहे. यापुर्वीच मागील महिन्यात तिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
२०११ साली आशियाई स्पर्धेत तिने कास्य पदकाची कमाई करीत लंडन आॅलंम्पिकचे दारही आपल्यासाठी खोलले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महीला ठरली. यानंतर चॅगवॉन येथे आयएफएस विश्व नेमबाजी स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकाविले.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिनेही सुवर्ण पदक, तर इचीआॅनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कास्य पदक पटकाविले. २२ आॅगस्ट २०१८ साली जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर नेमबाजीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारी व महिलांमध्ये पहीली भारतीय ठरली.
तिच्या या कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी अर्जुन पुरस्कार समितीकडे मागील आठवड्यात शिफारस केली होती. त्यानूसार या समितीकडून बुधवारी (दि.१८) रोजी तिला हा पुरस्कार जाहीर झाल्याचा मेल आला. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचे क्रीडानगरीत समजताच आनंदाची लाट पसरली.
कोल्हापूरची ‘राही’ पाचवी अर्जुनवीरयापुर्वी १९६३ साली हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना , तर १९७६ साली टेबलटेनिसपटू शैलजा साळोखे,२०११ साली सुवर्ण कन्या नेमबाज तेजस्विनी सावंत ,तर जलतरणात गोल्डन बॉय वीरधवल खाडे आणि आता २०१८ साली राही सरनोबत हिला या पुरस्काराने सन्मानीत केले जात आहे. यासह नेमबाजीमध्ये यापुर्वी २००० साली महाराष्ट्राच्या अंजली वेदपाठक-भागवत, २००४ साली- दिपाली देशपांडे, यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्यामुळे राही नेमबाजीमधील चौथी अर्जुन पुरस्कार विजेती ठरली.
माझ्या या यशात माझी जर्मन प्रशिक्षक मुनिक बयान, राष्ट्रीय रायफल असोसिएशन,आॅलंम्पिक गोल्डक्वेस्ट, भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई), महाराष्ट्र राज्य शासन,क्रीडा विभाग, फिजीकल ट्रेनर अक्षय,आहारतज्ज्ञ तांजिंदर आणि आई,वडील, काका,काकी सह माझे कुटूंब व मला पाठींबा देणाऱ्या करवीरनगरीच्या जनतेसह देशवासियांचे योगदान मोठे आहे.- राही सरनोबत, सुवर्ण कन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज
राहीला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने माझ्या कुटूंबासह मला अत्यानंद होत आहे. याहीपेक्षा आणखी चांगली कामगिरी करुन तिने देशाचा झेंडा असाच डोलाने फडकावित ठेवावा. इतकीच अपेक्षा आहे.- जीवन सरनोबत, राहीचे वडील
कोल्हापूरच्या क्रीडानगरीत आतापर्यंतचे हे राहीच्या रुपाने पाचवा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ही श्रृंखला यापुढे या नगरीलीत क्रीडापटूंनी अशीच सुरु ठेवावी.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाअधिकारी, कोल्हापूर