मुंबई : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी वर्चस्व राखले. १० ते ४० वयोगटात झालेल्या विविध गटात कोल्हापूरच्या पाच स्पर्धकांनी बाजी मारली. पुणे संघाने पाच आणि नाशिकच्या चार जलतरणपटूंनी स्पर्धेत छाप पाडली.गेट वे आॅफ इंडिया येथील समुद्रात संघटनेच्या वतीने खुली सागरी स्पर्धा उत्साहात पार पडली. ५ किमी आणि २ किमी अशा दोन प्रकारात जलतरणपटूंनी समुद्रात आपले कसब दाखवले. मुलांच्या आणि मुलींच्या (१६ ते २५ वर्षे) गटात कोल्हापूरच्या अनुक्रमे अनिकेत चव्हाण (३९:२९ सेंकद) आणि निकिता प्रभु (४१:५८ सेंकद) यांनी सुवर्ण पदक मिळवले. १३ ते १६ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूरच्या गौरव चव्हाण (३९:१८ सेंकद)आणि अर्थव देशमुख (३९:२३:७० सेंकद) यांनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर नाव कोरले. याच वयोगटात मुलींमध्ये कर्वी गायकवाडने ४३:४९ सेंकद वेळेची नोंद करत दुसरे स्थान पटकावले.१० ते १३ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या वरद कुवर (१९:५५:२२) आणि विनायक कुवर (१९:५८:१०) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. तसेच, मुलींच्या गटात २३:२३:१२ सेंकद वेळेची नोंद करत आशनी जोशीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या १३ ते १६ वयोगटात अनुजा उगळेने ४२:०४:०२ सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले.पुण्याच्या श्वेता कुराडेने २३:१० सेंकदासह (१०-१३ वर्षे) सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर मुलांमध्ये तनिष कुडाले (१०-१३ वर्षे) व मनिश खोमानेला (१३-१६) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पूजा कुमारीने ४३:१२ सेंकदासह रौप्य जिंकले. (क्रीडा प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या जलतरणपटूंचे वर्चस्व
By admin | Published: February 14, 2017 3:34 AM