कोल्हापूर : रेशन कार्ड संगणकीकरणाच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशन कार्ड हे आधार कार्डाशी जोडण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आजअखेर १३ लाख १३ हजार ९७७ लाभार्थ्यांना जोडत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल १३ लाख १२ हजार ८३९ लाभार्थ्यांचे लिंकिंग करून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी बुधवारी येथे दिली.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रेशन दुकानदार व अंगणवाडी सेविकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते, कोल्हापूर शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, इचलकरंजी शहरपुरवठा अधिकारी एम. ए. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.आगवणे म्हणाले, आतापर्यंत १३ लाख लाभार्थ्यांचे ल्ािंकिंग झाले असून, त्यांची संपूर्ण माहिती संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. उर्वरित कामही गतीने होणार आहे. रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या लिंकिंगचे काम पूर्ण झाले आहे. केशरी कार्डधारकांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी रेशन दुकानांकडे पाठ फिरविल्याने त्यांचे ल्ािंकिंग दुकानदार करू शकलेले नाहीत. त्यामुळे हे काम प्रलंबित राहिले आहे. म्हणून ही जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांना दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्डमागे पाच रुपये याप्रमाणे त्यांना मोबदला दिला जाणार आहे. रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ही रक्कम दिली जाईल. या सेविका आपापल्या अंगणवाडीशेजारी दुकानाच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची माहिती घेतील. या संदर्भात त्यांच्यासह रेशन दुकानदारांशी प्राथमिक चर्चा करून नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसून त्यांच्या वेळेनुसार त्यांनी हे काम करायचे आहे. दोन आठवड्यांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्यासाठी सध्या ३०० डाटा आॅपरेटर्स अहोरात्र काम करीत आहेत. आज शासनाच्या आॅनलाईन अहवालानुसार राज्यात कोल्हापूर क्रमांक एकवर पोहोचले आहे. ही आघाडी इथून पुढेही अशीच वाढत जाणार आहे. या प्रक्रियेनंतर रेशनकार्ड लाभार्थ्यांना ‘स्मार्ट कार्ड’ दिली जाणार आहेत. त्यावर कुटुंबप्रमुख महिलेचा फोटो असेल. त्याचबरोबर डिसेंबरपर्यंत प्रत्येक रेशन दुकानामधून बायोमेट्रिक पद्धत सुरू करावयाची आहे. दोन महिन्यांत ही यंत्रे शासनाकडून पुरविण्यात येणार आहेत. या यंत्रांवर कुटुंबातील सदस्यांचा अंगठा उमटविल्यावरच धान्य मिळणार आहे. तसेच या यंत्रांवर धान्याचे प्रमाण, धान्यासाठी द्यावे लागणारे पैसे, आदींचीही माहिती येईल. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अंगणवाडी सेविकांना या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अंगणवाडी सेविका यशोमती देसाई यांनीही यावेळी विचार मांडले. यावेळी शहर पुरवठा निरीक्षक सतीश ढेंगे, व्ही. बी. तोडकर, एम. एस. खैरमोडे, विनायक लुगडे, बी. सी. खोत, मंगेश दाणी, राहुल धाडणकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लिंकिंग’मध्ये कोल्हापूर अव्वल
By admin | Published: September 24, 2015 12:26 AM