२५ वर्षाची कोल्हापूरकरांची मागणी मान्य : पहिल्या टप्प्यासाठी १३७५ कोटींची तरतूद; कोल्हापूर-पुणे विद्युतीकरणास मान्यताकोल्हापूर : कोल्हापूर - वैभववाडी या रेल्वेमार्गाला मार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षापासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. शिवाय कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ६१ कोटी५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांच्या महत्वाच्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरु होण्यासाठी कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर-राजापूर, कोल्हापूर - वैभववाडी असे तीन मार्ग सुचविण्यात आले होते. त्यापैकी कमी अंतराचा आणि सोयीस्कर ठरणारा मार्ग म्हणून कोल्हापूर- वैभववाडी या मार्गाची निवड करण्यात आली. त्यानुसार या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण जानेवारीमध्ये पूर्ण झाले. शिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर करण्यात आला. त्यामुळे या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळेल अशी कोल्हापूरकरांना आशा होती.
सुमारे १०७ किलोमिटर अंतराच्या संबंधित रेल्वे मार्गासाठी एकूण ३०५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. पण, त्यापैकी १३७५ कोटी रूपयांची पहील्या टप्प्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याची घोषणा गुरुवारी अधिकृतरित्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला मोठया प्रमाणावर चालना मिळणार आहे. दरम्यान, गेल्या दहावर्षांपासून कोल्हापूर- पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाची मागणी प्रलंबीत होती. या मार्गाच्या विद्युतीकरणाला मान्यता देत त्यासाठी ६१कोटी ५० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली.असा असेल हा मार्गवैभववाडी - उपळे - सैतवडे - भूतलवाडी - कळे - भुये - कसबा बावडा - रेल्वे गुडस मार्केट यार्ड (कोल्हापूर) असा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरात जंक्शन उभारण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या सर्व्हेणचा आदेश दिला होता. त्यानुसार या मार्गाच्या सर्वेक्षणाला ५ मे २०१५ रोजी वैभववाडीतून सुरुवात झाली. मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. दोन पथकांद्वारे सर्व्हेणाचे काम पूर्ण केले आहे. मार्गाचा उपयोग असाकोल्हापूर हे कोेकण रेल्वेला जोडल्याने कोकण,कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूरमार्गे विशाखापट्टणम, कोलकाता, आदी पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला औद्योगिकदृट्या विशेष महत्व प्राप्त होण्यास चालना मिळणार आहे. तर मागास राहीलेला गगणबावडा तालुकासह कोकणाच्या विकासाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे.