कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत येथील जिल्हा परिषद देशात ‘लय भारी’ ठरली आहे. ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळाल्यानंतर पाठोपाठ केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ), जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांना निमंत्रित केले आहे. सन २०१३-१४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. परिषदेची केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेच्या सरचिटणीस रश्मी सारस्वत, सहसंशोधक अंजू राय यांनी १३ आणि १४ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येऊन वेगवेगळ्या उपक्रमांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राच्या पंचायत राज विभागाकडे देण्यात आला. अशाच प्रकारचे देशभरातील अहवाल आल्यानंतर प्रत्येक राज्यातील एका जिल्हा परिषदेची निवड या सन्मानासाठी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून कोल्हापूरला मान मिळाला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेला बुधवारी ई-मेलद्वारे कळविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात पहिला क्रमांक आणि केंद्र स्तरावर दखल एकाच वर्षी घेणे हे कौतुकास्पद आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम करणारे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीआज होणार अनोखे स्वागत..राज्य आणि केंद्र पातळीवर जिल्हा परिषदेला पोहोचविण्यात मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी प्रवेशद्वाराजवळ जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन अनोखा सन्मान करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद देशात ठरली ‘लय भारी’; ३० लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2015 12:49 AM