शिवसेनेला सोडून गेले ते बेंन्टेक्स होते व आता अस्सल सोनंच पक्षात राहिले, असे म्हणणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. काल कोल्हापुरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला, तो दिल्लीत असलेल्या मंडलिकांना कळविण्यात आला आहे. यावर आता संजय मंडलिकांची प्रतिक्रिया आली आहे.
चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे काही खासदार आपल्याला भेटले होते. त्यांनी शिंदे गटासोबत यावे, असे सांगितले. यावर मी त्यांना मी कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही, असे सांगितले. पावसामुळे मी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना भेटू शकलो नाही. यामुळे मी त्यांना काल मेळावा घेण्यास सांगितले होते. यावर कार्यकर्त्यांनी आपण शिंदे गटासोबत जावे असे कळविले आहे, असे मंडलिक म्हणाले.
आता पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी हे खासदार पुन्हा भेटतील. परवाची चर्चा ही साधक बाधक होती. आता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करेन आणि पुढचा निर्णय घेईन, असे मंडलिक म्हणाले. याचबरोबर मविआचा पहिला प्रयोग माझ्याच मतदारसंघात झाला होता. परंतू, राज्यातील सत्तेचा फायदा हा मित्रांना झाला, शिवसेनेला झाला नाही. यामुळे शिंदे गटासोबत एवढे आमदार गेले होते. अस्सल सोन्याचे मीच बोललो होतो, परंतू शिवसेना टिकवायची वाढवायची असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असे मंडलिक म्हणाले. परंतू, सर्वांनी एकत्र यावे, असे आपल्याला वाटत असल्याचे मंडलिक म्हणाले.
शिवसेनेचे पहिले खासदार.. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या काळात मंडलिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधार देण्यासाठी मातोश्रीवर थांबून होते. पक्षाच्या या कसोटीच्या काळात शिवसेनेसोबतच आहात याबद्दल समाजांतूनही चांगल्या प्रतिक्रिया होत्या. कारण त्याच पक्षाने मंडलिक यांना एकदा सोडून दोनदा उमेदवारी दिली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत १९९१ पासून गेल्या ३१ वर्षात शिवसेनेने सात उमेदवार दिले. परंतु ही जागा जिंकता आली नव्हती. ती मंडलिक यांच्या रुपाने पहिल्यांदा जिंकली. परंतु शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने अडीच वर्षात पक्षाशी गद्दारी केली अशीच इतिहासात नोंद होईल.