पुणे : गरजवंतांची गरज निर्माण होण्याआधी ती पूर्ण करणे हे खरे समाजकार्य. हे काम डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याने केले आहे. आपल्या गरजा कमीत कमी करत त्यांनी मेळघाटातील आदिवासींमध्ये जगून दाखवले आहे. ते खरे आम आदमी आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे बुधवारी काढले. मृणालिनी चितळे लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मेळघाटावरील मोहोर-डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता’च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. आमटे म्हणाले, ‘डॉक्टर झाल्यावर इतक्या साधेपणाने सामाजिक कार्याची उर्मी असणे आणि त्याचा कसलाही पश्चाताप होऊ न देणे हा खरा समाजसेवेचा ध्यास झाला. या दोघांनीही अनेकांकडून प्रेरणा घेतली, पण काम मात्र आपल्या पद्धतीने, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केले. त्यांनी गीतेचा कर्मवाद आचरणात आणला आहे. त्याग, सेवा, संघर्ष यांचा संगम असणारे हे जोडपे आहे. त्यांच्या कार्याबद्दल सांगणार्या या पुस्तकाने प्रत्यक्ष कामाची किंवा निदान स्वत:च्या गरजा कमी करण्याची तरी प्रेरणा मिळेल.’ (प्रतिनिधी)
कोल्हे दाम्पत्य खरे आम आदमी -प्रकाश आमटे
By admin | Published: May 15, 2014 2:54 AM