नवी मुंबई : मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्यावतीने ऐरोलीमध्ये कोळी -आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आठवले यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुंबईच्या विकासासाठी शिवसेना, भाजपा व आरपीआयने एकत्र येवून निवडणूक लढण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकीवेळी आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार राजन विचारे यांनीही महोत्सवाचे आयोजक रेवेंद्र पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. कोळी आगरी महोत्सवाच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या संस्कृतीचे दर्शन होत आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा महोत्सवातून जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. आयोजक रेवेंद्र पाटील यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. स्थानिक भूमिपुत्रांनी संस्कृती व परंपरा प्राणपणाने जपली आहे. ही संस्कृती प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले. महोत्सवाची सुरवात एकवीरा देवीच्या पालखी सोहळ्याने झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. महोत्सवाला विजय चौगुले, नगरसेवक राजू कांबळे, आकाश मढवी, संजू वाडे व मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
ऐरोलीमध्ये कोळी - आगरी महोत्सव सुरू
By admin | Published: January 20, 2017 2:56 AM