मुंबई : गुरुवारी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या ‘कोमेन’ चक्रीवादळाचा जोर शुक्रवारी ओसरला आहे. मात्र असे असले तरी हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून पुढील ७२ तासांसाठी विदर्भासह कोकणाला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. तर मुंबईत अधूनमधून कोसळणाऱ्या सरींचा जोर पुढील ४८ तासांसाठी कायम राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्य राजस्थान व लगतच्या भागावर आहे. परंतु त्याची तीव्रता कमी झाली आहे. ईशान्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या बांगलादेशाच्या भागावर असलेल्या ‘कोमेन’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्याचे रूपांतर खोल न्यून (कमी) दाबाच्या क्षेत्रात (डीप डिप्रेशन) झाले आहे. (प्रतिनिधी)