भाग्यश्री प्रधान, ठाणेअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एकमेव असलेले दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध होणार नाही, असे संकेत प्राप्त होत आहेत. ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी या स्टेडियमची हानी झाल्यामुळे खेळाखेरीज अन्य कुठल्याही कारणासाठी ते उपलब्ध करून द्यायचे नाही असा नियम तत्कालीन आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिका नियम धाब्यावर बसवून स्टेडियम नाट्य संमेलानकरीता उपलब्ध करून देणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांच्या ‘समन्वय प्रतिष्ठान’ने डिसेंबरमध्ये आयोजित केलेल्या ‘वसंत बाल महोत्सवा’ला महापालिकेने दादोजी कोंडदेव स्टेडियम दिले आहे. डावखरे यांच्यासाठी स्टेडियम उपलब्ध झाले तर दोन महिन्यांनी होणाऱ्या नाट्य संमेलनासाठीही ते उपलब्ध होईल व त्याकरिता शिवसेनेचे खासदार आणि संमेलनाचे आयोजक राजन विचारे हे पुढाकार घेतील, असा विश्वास नाट्यकर्मींना वाटत आहे. ठाणे शहरात यापूर्वी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारलेल्या मंडपामुळे मैदान उखडले गेले होते. त्यानंतर महापालिकेने ते जैसे थे केले. परंतु सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळांडूंच्या सरावात अडथळे येतात हे लक्षात आल्याने तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी कोंडदेव स्टेडियम फक्त खेळासाठीच वापरण्यात येईल, असा ठराव महासभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर या स्टेडियमवर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत. डावखरे यांच्या ‘वसंत बाल महोत्सवाला’ही यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र यावेळी ती दिली गेली.यंदाचा ‘वसंत बाल महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही. त्यात खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळेच महापालिकेने हा कार्यक्रम स्टेडियमवर करण्यास परवानगी दिली आहे.- निलिमा निरंजन डावखरे, आयोजक, वसंत बाल महोत्सवठाणे महापालिकेच्या महासभेत नाट्य संमेलनाला कोंडदेव स्टेडियम देण्याचा ठराव मंजूर करवून घेतला तर हे स्टेडियम संमेलनास देण्यात अडसर येणार नाही. संमेलनाचे आयोजक तसा निश्चित प्रयत्न करतील.- विद्याधर ठाणेकर, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे सदस्य, ठाणे
मराठी नाट्यसंमेलनासाठी कोंडदेव स्टेडियम मिळणे अशक्य!
By admin | Published: November 26, 2015 3:08 AM