मुंबई : थंडी अनुभवण्यासाठी व नाताळच्या सुटीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी मुंबईकरांनी शहराबाहेर धूम ठोकली. परिणामी, मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. शिवाय मुंबई-गोवा महामार्गावरदेखील वाहनांची लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांची ‘प्रवासकोंडी’ झाल्याचे दिसून आले.गेले काही दिवस शहरातील तापमानाचा पारा घसरल्याने मुंबईकराना थंडीची चाहूल लागली. त्यामुळे गुलाबी थंडीत नाताळ साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी पिकनिकचे बेत आखण्यास सुरुवात केली. पिकनिकसाठी महाबळेश्वर, माथेरान ही ठिकाणे अव्वल आहेत. परिणामी, मोठ्या संख्येने मुंबई-पुणे महामार्गावर वाहने आल्याने टोल नाक्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टोलनाक्यांवर सुट्ट्या पैशांची असलेली चणचण ही या रांगांना कारणीभूत ठरली. परिणामी, प्रवासकोंडीत अडकलेल्या मुंबईकरांचा पिकनिकचा बेत काही अंशी कोलमडला.नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी गोव्याकडे पर्यटकांची रीघ लागलेली असते. शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात अग्रेसर आहेत. यंदाही गोवा, कर्नाळा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शनिवारी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूककोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावरदेखील पर्यटकांना प्रवासकोंडीचा फटका बसला. मुळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ दोनच लेन वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. त्यातच शनिवारी सुकेळी खिंडीत टँकर बंद पडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप झाला. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. (प्रतिनिधी)
मुंबई - पुणे मार्गावर कोंडी
By admin | Published: December 24, 2016 10:43 PM