ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज्यभरात पाऊस सक्रिय झाला असून, हवेतही ब-यापैकी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा सोसणा-या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाचा जोर जून महिन्यांत असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या आठवड्याभरात कोकणासह गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असून, पावसामुळे शेतक-यांनीही पेरण्यांच्या कामांना सुरुवात केली आहे.
येत्या 5 दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात (कोकण विभागात) हवामान विभागानं अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कोकणातील रहिवाशांची सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसील नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा आणि गरज पडल्यास पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, दापोली, राजापूर, गुहागरमध्ये जोरदार पाऊस होतो आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसानं ब-यापैकी जोर धरला आहे.