लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केरळात दाखल झालेला मान्सून कधी एकदा येतोय, याकडे अवघा मऱ्हाटी मुलुख आतुरतेने वाट पाहात असताना बुधवारी गोव्यासह कोकण किनारपट्टीला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. २ ते ४ जून दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्हीच्या खारेपाटण फिडरमध्ये बिघाड झाल्याने ग्रामीण भागातील विजप्रवाह खंडित झाला आहे. विजेची उपकरणे जळण्याच्या घटना घडल्या.वैभववाडी तालुक्याला पावसाने दणका दिला. बुधवारी सकाळपर्यंत तब्बल २२0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर ०़१, बुलढाणा ८, चंद्रपूर १९, वर्धा ६, यवतमाळ येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
कोकणाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले
By admin | Published: June 01, 2017 3:00 AM