मुंबई : वीर ते करंजाडीदरम्यान मालगाडीचे डबे घसरून रविवारी झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेचे वेळापत्रक अद्याप रुळावर आलेले नाही. त्यामार्गे जाणाऱ्या सर्व ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावत असून, गणेशोत्सवास कोकणात जाणारे चाकरमानी लटकले आहेत.वीर ते करंजाडी दरम्यान डाऊनला जाणाऱ्या एका मालगाडीचे सात डबे रविवारी रुळावरुन घसरले होते. हा मार्ग पूर्ववत होण्यास २६ तास लागले. मात्र ५०० मीटरच्यापर्यंतच्या ट्रॅकचे मोठे नुकसान झाल्याने नवीन ट्रॅक व स्लीपर्स टाकण्याचे काम सुरु असल्याने त्याचा परिणाम कोकणमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर झाला. सोमवारी काही ट्रेन तब्बल सहा ते सात तास उशिराने धावत होत्या. मात्र मंगळवारी याच मार्गावरील सर्व ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावू लागल्या.करंजाडीजवळ एका वळणावर सुरू असलेल्या ट्रॅकचे काम पूर्ण होण्यास आणखी एक दिवस लागणार असल्याने बुधवारी देखील प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे दहा तास उशिरा
By admin | Published: August 27, 2014 4:47 AM