महेश चेमटे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय रेल्वेने डिजिटायझेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार, कोकण रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत, ब्लॉग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉगमध्ये कोकणाच्या संस्कृतीविषयी लिखाण आणि रेल्वेच्या कार्यक्रमावर ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगरला थेट टिष्ट्वट करून नेटिझन्सला आमंत्रणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कोकण पट्ट्यासह गोवा, कर्नाटक आणि केरळ येथील ब्लॉगरला कोकण रेल्वेने ब्लॉग लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.देशभर रेल्वेचे विश्वासार्ह आणि विस्तीर्ण जाळे पसरले आहे. रेल्वेचे डिजिटायझेशन केल्याने प्रवाशांभिमुख सोयी पुरवणे अधिक सोपे होईल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. या धर्तीवर कोकण रेल्वेवर ब्लॉग सुरू करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियातून दर्जेदार लिखाण काही नेटिझन्सकडून करण्यात येते. या नेटिझन्सना ‘कोकण रेल्वे’च्या छताखाली ‘डिजिटल’ व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी, कोकण रेल्वेने ब्लॉगर्सना जाहीर आमंत्रणे दिली आहेत. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन’च्या अधिकृत टिष्ट्वटरवरून टिष्ट्वट करून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वेने डिजिटायझेशनअंतर्गत रेल्वे हद्दीतील सर्व जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी ट्रॅक मॅनेजमेंट सीस्टिम (टीएमएस) हे वेब अॅप विकसित केले आहे. रेल्वेच्या स्थावर मालमत्तेचा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सीस्टिमच्या माध्यमातून (जीआयएस) नकाशा तयार करण्याचे काम वेगात आहे. इस्रोच्या ‘भुवन’ उपग्रहामार्फत रेल्वेचे टीएमएस अॅप कार्यरत आहे. हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) दिल्ली येथे सुरू असून, लवकरच देशातील सर्व स्थानकांचा समावेश यात करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे ‘ब्लॉग’वर धावणार
By admin | Published: June 19, 2017 2:35 AM