रत्नागिरी : कोकण रेल्वेने मार्गावरील रोहा ते मडुरापर्यंतच्या सर्व स्थानकांवर आज स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात १९०० कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मिळून सुमारे ६ हजारांवर अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नंदू तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वे आणि मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी कोकण रेल्वे नेहमीच कार्यरत असून, स्वच्छता मोहीम वारंवार राबविली जाते. वर्षातून १०० तास स्वच्छता मोहीमेसाठी दिले जातात. प्रवासी खाद्य वस्तू खाल्ल्यानंतर त्याचे रॅपर्स, थंड पेयांच्या बाटल्या व अन्य टाकाऊ वस्तू रेल्वेत, रेल्वेमार्गावर फेकतात. त्यामुळे रेल्वे मार्गावरही कचऱ्याचे साम्राज्य होते. हे टाळण्यासाठी व प्रवाशांंना कचरा कुंडीमध्ये टाकण्याची सवय होण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्येही कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मानसिकता बदलण्यासाठी असे प्रबोधन केले जात आहे. रेल्वे ही राष्ट्रीय मालमत्ता असल्याने रेल्वे, ट्रॅक, स्थानके व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवाशांनीही आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे तेलंग म्हणाले. कोकण रेल्वेच्या या विभागातील ३१ स्थानकांवर आज सकाळपासूनच स्वच्छता मोहीम सुरू झाली, अशी माहिती तेलंग यांनी दिली.रत्नागिरी स्थानकातील ड्युटीवर असलेले कर्मचारी वगळून अन्य सर्व कर्मचारी स्वच्छता मोहिमेत हाती झाडू घेऊन सहभागी झाले होते. रत्नागिरी स्थानकातील स्वच्छता मोहीम सुरू असताना तेलंग यांच्यासमवेत पत्रकारांनीही स्थानकाची पाहणी केली.रत्नागिरीसह जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या चिपळूण, उक्षी, आरवली, संगमेश्वर, कामथे, सावर्डे, खेड, राजापूर, विलवडे, निवसर या स्थानकांवरही कोकण रेल्वेमार्फत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. सर्वच ठिकाणी या मोहीमेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे तेलंग यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)श्रमिक स्मारकाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्यारत्नागिरी रेल्वे स्थानकासमोरील कोकण रेल्वे प्रकल्पाचे काम करताना शहीद झालेल्यांच्या स्मारकाची आज स्वच्छता सुरू असताना तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. स्मारकाचेही पावित्र्य राखले जात नसल्याने ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे तेलंग यांनी सांगितले. यापुढे अशा प्रकारे या जागेचा वापर होताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रत्नागिरी, खेड स्थानकातही बायोटॉयलेट होणारकोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण व कणकवली या स्थानकात प्रवाशांकरिता बायोटॉयलेटची सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरी व खेड स्थानकातही बायोटॉयलेट उभारण्याबाबतचा प्रस्ताव आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही होऊ शकते. रेल्वेमध्ये बायोटॉयलेट देणे शक्य असले तरी त्याच्या वापराबाबत प्रवाशांचे आधी खूपच प्रबोधन करावे लागणार आहे. चुकीच्या पध्दतीने बायोटॉयलेटचा वापर झाल्यास ही सुविधाच ठप्प होऊ शकते, असे तेलंग म्हणाले.
कोकण रेल्वेची ‘स्वच्छता एक्स्प्रेस’ सुसाट
By admin | Published: October 02, 2014 10:47 PM