मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा मारा सुरूच होता. कुलाबा येथे ५२.२ तर सांताक्रुझ येथे ३८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर काही मिनिटांच्या फरकाने मुसळधार सरी कोसळत होत्या. विशेषत: वेगाने वाहणारे वारे यात आणखी भर घालत होते. गुरुवारी दिवसभर पाऊस थांबून थांबून कोसळत असल्याने कोठेही पाणी साचले नाही. मात्र रस्ते वाहतुकीचा वेग किंचित धिमा झाला. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ८ ठिकाणी घरांचा भाग पडला. ३ ठिकाणी दरडीचा भाग पडला. २२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३३ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
२६ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
२७ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२८ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२९ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.