मुंबई : संततधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमध्ये समाधानकारक साठा होऊ लागला आहे. कोयना धरणात गत चोवीस तासांत पाच टीएमसी साठा वाढून ७२.८९ टीएमसी झाला आहे. पुण्यातील धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने उजनीत पाणी येत आहे. मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरू असून गोदावरीचे पाणी जायकवाडीकडे झेपावू लागले आहे.
कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. नदी, नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. राजापूरमध्ये पूर आला आहे. चिपळूण, खेड जलमय झाले आहे. रत्नागिरी बाजारपेठेतही पाणीच पाणी होते. कोल्हापूरात पंचगंगेला पूर आला असून ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.सांगली जिल्ह्यात संततधार कायम आहे. दुष्काळी तासगाव, कवठेमहांकाळ, जत, विटा, कडेगाव या तालुक्यातही पाऊस पडला आहे. कापूसखेड (ता. वाळवा) येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, वेण्णा नद्या दुधडी वाहू लागल्या आहेत.
विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर संततधार पाऊस आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. अमरावतीमध्ये धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. वर्धा यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात आजरा येथे ट्रक पलटी होऊन १०० सिलेंडर वाहून गेले. मुंबईत कळवा येथे दरड कोसळून दोघांचा तर लोणावळ््यात धबधब्यात पडून युवकाचा मृत्यू झाला.उस्मानाबादमध्ये संततधारमराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. नांदेडमधील किनवट तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाली.परभणी जिल्ह्यात भीज पाऊस झाल्याने खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. नद्यांचे प्रवाह मात्र अनेक ठिकाणी कोरडेच आहेत.