देवगड (जि. सिंधुदुर्ग) : रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या मातीत पिकणाऱ्या हापूसला जगात तोड नाही. रंग, रूप आणि स्वाद यामध्ये सरस असलेल्या इथल्या हापूसवर आता जीआय मानांकनाची (जिओग्राफिकल इंडिकेशन) मोहर उमटणार आहे. येत्या पंधरवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे हापूसच्या नावाखाली होणाऱ्या इतर आंब्यांच्या विक्रीला लगाम बसून कोकणचा राजा जगभरात झिम्मा खेळेल. देवगड, रत्नागिरीतील हापूस म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा बाजारात दाखल झाला की...‘हापूस इलो, हापूस इलो’चा एकच जयघोष होतो. परंतु कुठेही पिकणारा पण हापूससारखा दिसणारा आंबाही ‘हापूस’ त्यातही देवगड, रत्नागिरीचा हापूस म्हणून सर्रासपणे विकला जात होता. यामुळे अलीकडच्या काळात ब्रँडिंगवरही विपरीत परिणाम झाला होता. आता जीआय मानांकनामुळे मात्र याला लगाम बसणार आहे. बौद्धिक संपदा संस्थेने (इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी आॅर्गनायझेशन) मुंबईत सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी देवगड, रत्नागिरीतील हापूसला जीआय मानांकन देण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी व देवगड हापूसचे वेगळेपण सांगणारे सरकारी दस्तऐवज तसेच वैज्ञानिक माहिती सादर करण्यास संस्थेने सांगितले आहे. याशिवाय इतर भागातील हापूसला जीआय देण्यात आपली अडवणूक नसावी, अशी अट संस्थेने घातली आहे. पंधरा दिवसांत ही कागदपत्रे सादर केल्यानंतर देवगड व रत्नागिरी हापूसला जीआय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (प्रतिनिधी)कोकणच्या लाल मातीची किमया!कोकणातील हापूसची सर दुसऱ्या आंब्याला येत नाही. याचे कारण इथल्या वैशिष्ट्यपूर्ण लाल मातीत आणि हवेत आहे. इथल्या मातीतील विशिष्ट खनिजांमुळे हापूसचा स्वाद जगावेगळा होतो. पण केवळ कोकणातील लाल मातीमुळे हे घडत नाही तर तिथले एकूणच पर्यावरणही कारणीभूत आहे. घाटावरच्या बऱ्याच बागायतदार शेतकऱ्यांनी कोकणातील माती नेऊन हापूसची लागवड केली. पण कोकणच्या हापूसचा गोडवा काही त्याला आला नाही. जीआय मानांकनामुळे या पर्यावरणीय वेगळेपणावर कायदेशीर शिक्कामोर्तब होणार आहे.
कोकणच्या हापूसचा पुन्हा झिम्मा !
By admin | Published: June 08, 2016 4:53 AM