ऑनलाइन लोकमतबीड : कोपर्डी, (ता. कर्जत) येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अर्ज चौकशीवर ठेवला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज ठाकरे अडचणीत आले आहेत. दलित संघटनेने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करुन गुन्हा नोंदविण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी नुकतीच मुलीच्या कुटुुंबियांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर तो रद्द केला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राज्य घटनेने मागासवर्गीयांना अॅट्रॉसिटी कायद्यान्वये सामाजिक सुरक्षेचे कवच दिले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने मागासवर्गीयांचा अवमान झाला असून त्यांचे विधान घटनाविरोधी असल्याचा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. राज ठाकरेंविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी डॉ. ओव्हाळ यांनी केली आहे. निरीक्षक उमेश कस्तुरे म्हणाले, तक्रार अर्ज आला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविता येतो का? हे तपासले जाईल. जालना येथे अशा प्रकारचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिकडे हा गुन्हा वर्ग करु.
कोपर्डी प्रकरण : राज ठाकरेंविरुद्ध बीड पोलीसात तक्रार
By admin | Published: July 27, 2016 6:56 PM