मुंबई : कोपर्डीची घटना वाईट आहे. गुन्हेगाराची जात असू शकत नाही. तो गुन्हेगारच असतो. आज जे मोर्चे निघतात तो आक्रोश आहे. याचा दुसरा अर्थ कोणी काढू नये. मराठा समाजाने मोर्चे काढत संयम पाळला. मात्र अशा प्रकरणाचे राजकारण होता कामा नये, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक महिलेच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मंत्रिपद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सत्काराला उत्तर देताना आठवले म्हणाले, की कोपर्डी प्रकरणात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिले. ज्यांनी अत्याचार केले, खून केले ते लोक आमचे नाहीत. त्यांना फाशी झालीच पाहिजे. मराठा समाजाने मोर्चे काढले. आम्हीपण मोर्चे काढू. माझ्याकडे केंद्राचे सामाजिक न्याय खाते असले तरी कायदा हा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही. त्यामुळे कायदा रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. जातीय वादातून अत्याचार होत असले तरी अॅट्रॉसिटी कायदा अबाधित राहणार. रामदास आठवले कोण आहे? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. ‘आठवले हा माणसाला जोडणारा फोन आहे. आठवले दलित चळवळीचा बोन आहे’, असं त्यांनी म्हणताच टाळ््यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलतील, असे लोक म्हणतात. पण संविधान बदलण्यापेक्षा तुम्ही बदला, असेही ते म्हणाले. कोपर्डीच्या निमित्ताने वातावरण गढूळ करण्याचे काम कोणी करू नये. हे पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले. अविनाश महातेकर म्हणाले, की कोपर्डीचे राजकारण सुरु आहे. दंगली पेटवण्याचे राजकारण आम्ही होऊ देणार नाही. (प्रतिनिधी)
‘कोपर्डी’चे राजकारण नको
By admin | Published: September 02, 2016 1:33 AM