ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १७ : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना रविवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्यावर अंडे फेकण्याची घडना घडली़. कर्जतमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोपर्डी घटनेतील पहिला आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे याला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती़ तर या घटनेतील दुसरा आरोपी संतोष गोरख भवाळ याला पोलिसांनी शनिवारी अटक केली़ या दोघांनाही रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ सुनावणी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात कोर्टातून बाहेर पडताना या दोघा आरोपींवर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंडे फेकले़ तसेच या घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या़.
कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणानंतर कर्जत परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला होता.
तसेच कर्जतमधील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला होता. यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे अंदोलन मागे घेण्यात आले.
या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.