मुंबई : मशीद बंदरजवळील ब्रिटिशकालीन पूल असलेल्या कर्नाक पुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. हा पूल पाडण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने पूल बांधण्याचे काम करणारी कंपनी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कर्नाक पूल बांधण्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. रेल्वेमार्गावरील असलेले जुने धोकादायक पूल हे रेल्वे आणि पालिकेच्या मदतीने पाडण्याचे नियोजन केले जात आहे. यातील सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूलही धोकादायक झाला होता. या पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबर २०१५पासून हातोडा चालविण्यात आला आणि मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर येणाऱ्या पुलाचा महत्त्वाचा भाग २०१६च्या जानेवारी महिन्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. हँकॉक पुलानंतर मशीद बंदरजवळील १४६ वर्षे जुना असलेला कर्नाक पूल पाडण्यासाठीही गेले काही महिने नियोजन केले जात आहे. मात्र यासाठी रेल्वे आणि पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर हा पूल पाडण्यासाठी सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मशीद, सॅण्डहर्स्ट रोड परिसरातील रहिवाशांसाठी आणि रहदारीसाठी फायदेशीर ठरणारा हा पूलही धोकादायक झाला आहे. त्यामुळे रेल्वेमार्गावर येणारा कर्नाक पूल पाडण्याचा निर्णय घेतला. याबाबत मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) ओ. कोरी यांनी सांगितले की, कर्नाक पूल तोडण्यापूर्वी तो बांधण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. लवकरच यावर निर्णय होईल. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचे प्रतिज्ञापत्रही सादर केले जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेवर येणाऱ्या पुलाचा भाग तोडण्यासाठी रेल्वेला अडीच कोटी रुपयेही देण्यात आले आहेत. हा पूल बांधण्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च येईल. (प्रतिनिधी)>सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल तोडण्याचा निर्णय २००९मध्ये घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तोडण्याचे काम २०१६मध्ये करण्यात आले. हा पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचे नियोजन आहे. परंतु न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दहा महिने होत आले तरी पूल उभा न राहिल्याने स्थानिकांचे मात्र हाल होत आहेत.
कर्नाक पुलावर हातोडा?
By admin | Published: November 19, 2016 2:44 AM