सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले आणि स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांना रोखले. त्यानंतर कोथळे कुटुंबीयांनी तीन तास पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या मारला. सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर ते घरी परतले.सांगली शहर पोलिसांनी कोठडीत अमानुष मारहाण केल्याने ६ नोव्हेंबरला अनिकेतचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा पोलिसांना अटक करून बडतर्फ केले आहे.प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीबाबत कोथळे कुटुंबीयांनी साशंकता व्यक्त केली आहे. उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याबाबतही कोथळे कुटुंबीयांसह सर्वपक्षीय कृती समितीचा आक्षेप आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपाली काळे यांच्याकडून कोथळे प्रकरणाची माहिती घेतली. शिवाय सोमवारी झालेल्या नागरिक व पोलिसांच्या बैठकीसही त्या उपस्थित होत्या. यामुळे संतप्त झालेले अनिकेतचे भाऊ आशिष व अमित यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला.दुपारी दोघे बाइकवरून पोलीस ठाण्यापाशी आले आणि अंगावर रॉकेल ओतून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत अनिकेतची पत्नी संध्या, मुलगी प्रांजल, आई अलका, वडील अशोक व इतर नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मारला.कोथळे प्रकरणाचा तपास सीआयडीकडून योग्य प्रकारे सुरू आहे. याबाबत अनिकेतच्या नातेवाइकांना माहिती हवी आहे. तपासाचा आढावाघेऊन नातेवाइकांच्या शंकांचे निरसन करणार आहोत.- श्रीकांत पाठक, पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी)
कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न, सांगलीत खळबळ; पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:16 AM