मुंबई: मागील काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राज्याचे अल्वसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडेंवर नवनवीन आरोप करत असतात. मलिकांनी नुकतच वानखेडे एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने नवाब मलिकांवर निशाणा साधला.
क्रांती रेडकरने दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्तराँ अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत या बारची माहिती दिली आहे. यासोबतच मलिकांवर 'फर्जीवाडा' शब्द वापरुन टीका केली आहे. ट्वीटसह क्रांती म्हणते, ''पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्तराँ अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा 'फर्जीवाडा'. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा, जबाबदार पदावर बसून हे असं वागताहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे,'' असं क्रांती म्हणाली.
बारवरुन नवाब मलिकांचे आरोप
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला. 'समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,' अशा कॅप्शनसह मलिकांनी हा फोटो शेअर केला होता. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला असून, तो 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे.
समीनर वानखेडे यांचे स्पष्टीकरण
समीर वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच 2006 पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.