कोल्हापूर : कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून तिथे शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व्हावे, यासाठी कोल्हापुरात ‘कृषिभवन’ उभे करणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. महाराष्ट्राला दिशादर्शक असे कृषिभवन उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘आत्मा’च्या वतीने कसबा बावडा येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. हा महोत्सव सोमवारपर्यंत चालणार आहे.तांदूळ महोत्सवात खात्रीशीर वाण मिळत असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त तांदूळ खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, की यंदा ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत मुंबई, नागपूर व पुणे येथे २६ आठवडे बाजार केले आहेत. कोल्हापुरात पणन विभागाचे अधिकारी जागा शोधत आहेत.’ खासदार महाडिक म्हणाले, की तांदूळ महोत्सव सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प होता, तो संपूर्ण राज्याने स्वीकारला. शेतीमालाला ‘एमआरपी’ नाही; पण येथे शेतकऱ्यांना स्वत:च दर ठरविण्याची मुभा आहे.महोत्सवाचे उद्घाटन सुरू असतानाच तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. आजरा घनसाळ, काळा जिरगा खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. (प्रतिनिधी)भेसळ करून शेतकऱ्यांना बदनाम करू नका; राजू शेट्टींची स्टॉलधारकांना सूचना तांदूळ महोत्सवामध्ये ग्राहक मोठ्या विश्वासाने येत असतात; पण तांदळात भेसळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा यातून शेतकरी बदनाम होईल, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्टॉलधारकांना केली. खासदार शेट्टी यांनी शनिवारी तांदूळ महोत्सवाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सहभागी ४० स्टॉलधारकांसह ग्राहकांशी चर्चा केली.
कोल्हापुरात ‘कृषिभवन’ उभारणार
By admin | Published: May 08, 2016 2:14 AM