ऑनलाइन लोकमत
कुडाळ, दि. १८ - नव्याने तयार झालेल्या कु़डाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने सहा, भाजपने एक आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.ही नगरपंचयातीची निवडणूक असली तरी, इथे काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना असा थेट सामना होता. नारायण राणे, शिवसेना आणि भाजपने इथे पूर्ण ताकत पणाला लावली होती.
शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक इथे निवडणुकीची जबाबदारी संभाळत होते. भाजपचे डोंबिवलीतील आमदार रविंद्र चव्हाण इथे तळ ठोकून होते. मात्र निकालावरुन त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण दोनवर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून इथे समीकरण बदलली. नारायण राणे यांचे सुपूत्र आणि काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा लोकसभेला पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला स्वत: नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता.
त्यानंतर जिल्ह्यातील अन्य निवडणुकातील निकालही राणे यांच्यासाठी फारसे उत्साहवर्धक नव्हते. जिल्हयातील पुढील राजकारणात राणे यांचे वजन घटणार कि, वाढणार त्यादुष्टीने कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची होती. तूर्तात तरी कुडाळमध्ये नारायण राणे यांनी बाजी मारली आहे.