पडळकरांची जीभ धजावलीच कशी?
शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजितदादा पवार सहभागी झाल्यानं भाजपचे फायरब्रॅंड आमदार गोपीचंद पडळकर यांची गोची झालेली. कारण अजित पवार आणि पवार कुटुंबावर घेण्याचा एककलमी कार्यक्रम राबवता येत नव्हता; पण अखेर पडळकर बोललेच. नुसतं बोललेच नाहीत तर अजितदादांना चक्क 'लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणाले. परिणामी पुण्यात आगडोंब उसळू लागला; पण देवेंद्रभचा हात डोक्यावर असलेले पडळकर बोललेच कसे, असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले. अजितदादांना सोबत घेतल्याचं जुन्या-जाणत्या भाजपवाल्यांना आवडलं नसल्यानं नुसती घालमेल सुरु होती. आता तिकडूनच आदेश आल्यानं पडळकरांची जीभ धजावली म्हणे! खरं की काय ?
अजितदादा चक्क बोलणं टाळतात...
अजितदादा पवार यांनी या | आठवड्यात चार-पाचदा प्रसारमाध्यमांना टाळलं. तिखट जिभेचे अजितदादा म्हणजे हमखास 'टीआरपी वाढवणारा चेहरा. पण ते बोलण्याऐवजी टाळायला लागल्यानं पंचाईत झाली. कुणी म्हणे, चुकूनमाकून काही बोलल्यानं महायुतीत बिघाड नको म्हणून भाजपनं सूचना दिल्यात, तर कुणी म्हणे, सारखं शरद पवारांविषयी विचारल्यामुळं दादा वैतागलेत. काही खवचट पुणेकर म्हणतात, दादांनी भाजपशी संग केल्यामुळं परवा संघाच्या प्रतिनिधींच्या राष्ट्रीय बैठकीत गुपचूप येऊन बसावं लागलं आणि ध्यानधारणा सुरु करावी लागली, तर काही 'वावडी' कार म्हणतात, दादांना कुणी महागुरुंनी जिभेवर संयम ठेवायचा सल्ला दिलाय ! खरं- खोटं दादाच जाणोत.
मन चिंती, ते वैरी ना चिंती
छत्रपती संभाजीनगरातील बछड्यांचा नामकरण सोहळा सध्या गाजतोय. नामकरणावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या नावाच्या चिठ्ठीमध्ये 'आदित्य' हे नाव आले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ती चिठ्ठी बाजूला सारली. अखेर बछड्याचे नाव 'कान्हा' ठेवलं. या नामकरण सोहळ्याची चर्चा पार पुण्यापर्यंत रंगली. त्याबद्दल खवचट पुणेकरानं विचारलं, 'अहो, सांगा बरं. नावाच्या त्या चिठ्ठीत अजितदादांच्या 'पार्थ'चं किंवा शिदेसाहेबांच्या 'श्रीकांत'चं नाव आलं असतं, तर मुनगंटीवारांनी बाजूला सारली असती का चिठ्ठी?' तिथला शिवसैनिक लगेच म्हणाला, 'आदित्य वाघाचा बछडा आहे. मुनगंटीवारसाहेब, मन जे चिंती ते वैरी ना चिती, लक्षात ठेवा!