केडगाव : भीमा-पाटस कारखाना अडचणीत आहे. त्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच भविष्यामध्ये कारखाना सुधारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. केडगाव येथे मयूरेश्वर रुग्णालयाच्या शुभारंभप्रसंगी पवार बोलत होते. पवार म्हणाले, सध्या चुकीच्या शासकीय धोरणामुळे सगळ्या महाराष्ट्रात साखर कारखानदारी संकटात आहे. भीमा पाटस कारखाना त्यापैकीच एक आहे. कामगारांचे वेतन, थकीत कर्ज यामुळे अडचणी वाढल्या आहेत. भीमा पाटस कारखान्याचे वेळीच पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सगळ्यांनी एकत्र बसून या कारखान्याचे दुखणे समजून घेऊ. साखरविक्री ३२०० रुपये दराने असल्याने उसाला ३००० पेक्षा अधिक भाव देता येणार नाही. चालू वर्षी ऊसटंचाई असली तरी पुढील वर्षी ऊसउत्पादन अधिक वाढणार आहे. त्या वेळी अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यादृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे. या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, की पुणे दौंड लोकल सुविधा लवकरच सुरु होत आहे. भविष्यात ही लोकल भिगवणपर्यंत यावी. दौंड पुण्याचे उपनगर होत असल्याने भविष्यात दौंडचे महत्त्व वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार अशोक पवार, नामदेव ताकवणे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, नामदेव बारवकर, आनंद थोरात, गोरखे गुरुजी, अप्पासो पवार, वैशाली नागवडे, पोपटराव ताकवणे, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, सुभाष बोत्रे उपस्थित होते. >कुल यांना वाढदिवसाच्या अनपेक्षित शुभेच्छा आज ३० आॅक्टोबर रोजीआमदार राहुल कुल यांचा वाढदिवस होता. व्यासपीठावर रमेश थोरात यांनी आपल्या भाषणात राहुल कुल यांना वाढदिवसानिमित्त शाब्दिक शुभेच्छा देऊन उपस्थितांना अनोखा धक्का दिला. यावर सर्व ग्रामस्थांनी हसून व टाळ्यांच्या कडकडात या शुभेच्छाला दाद दिली.
कुल-थोरात यांनी एकत्र यावे
By admin | Published: October 31, 2016 1:30 AM