- डिप्पी वांकाणी, मुंबई मुंबईतील कुलभूषण जाधव यास पाकिस्तानमध्ये एक महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुलभूषण याने एका महिन्यापूर्वी पत्नीशी शेवटचा संपर्क साधला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.कुलभूषण हा रॉ संघटनेचा हस्तक असल्याच्या आरोपावरून त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच, जाधव कुटुंबीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शनिवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते पवईतील ज्या हाउसिंग सोसायटीमध्ये राहतात, त्या इमारतीच्या आसपास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बोलायला कोणीच तयार नाहीजाधव कुटुंबीय पवईच्या ज्या इमारतीत राहतात, तिथे कडक पोलीस बंदोबस्त आहे. कुलभूषणला अटक केल्याचे वृत्त येताच तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, त्याच्या इमारतीतील कोणीही त्याच्या वा कुटुंबाविषयी बोलायला तयार झाले नाही. काहींनी तर आम्ही त्या कुटुंबाला ओळखत नसल्याचेच सांगून टाकले.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणला गेला होता. त्याचा आणि भारताच्या रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर यंत्रणेशी काडीमात्र संबंध नाही. त्याने नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याचे वडील हे माजी पोलीस सहायक आयुक्त आहेत. कुलभूषणने तीन महिन्यांपूर्वी आपले वडील सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, तर पत्नीशी तो एका महिन्यापूर्वी बोलला होता. त्यानंतर ना त्याचा फोन वा मेल आला, ना त्याच्याशी घरच्यांचा संपर्क झाला. त्यामुळे एका महिन्याच्या काळातच त्याला पाकिस्तान सरकारने अटक केली असावी, असे घरच्यांना वाटत आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणमधील बंदर अब्बास आणि छाबहर बंदरांतून मालवाहतूक करीत असे. त्याच्याकडे इराणमध्ये जूनपर्यंत राहण्यासाठी अधिकृत परवाना होता. त्याचा स्वत:च्या व्यापाराखेरीज कशाशीही संबंध नव्हता, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही सांगितले.
कुलभूषणला महिन्यापूर्वीच अटक ?
By admin | Published: March 27, 2016 3:31 AM