मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेला देतय कुमारस्वामींचं उदाहरण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:13 PM2019-10-24T22:13:01+5:302019-10-24T22:13:40+5:30
काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. जेणे करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल असा इरादा काँग्रेसचा आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळीच युती करणारे भाजप आणि शिवसेना यांच्यात आगामी काळात मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. परंतु, विधानसभा निवडणूक निकालात भाजप-शिवसेनेला 2014 पैक्षा कमी जागा मिळाल्या आहे. मात्र काँग्रेसच्या भूमिकेने युतीत शिवसेनेचा दर वधारला आहे. त्याचवेळी भाजपकडून शिवसेनेला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीं यांच उदाहरण देण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसोबत 15 अपक्ष असल्याचा इशारा दिला. त्यामुळे ही रस्सीखेच कुठं थांबणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. जेणे करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल असा इरादा काँग्रेसचा आहे. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेला याचा फायदा होऊ शकतो. मात्र त्याचवेळी भाजपच्या प्रवक्त्यांकडून कर्नाटकच्या कुमारस्वामी सरकारची आठवण शिवसेनेला करून देण्यात येत आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने जीडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. तसेच मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामी यांना बसवले होते. मात्र भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी सरकार पाडले आणि भाजप सरकार स्थापन केले. तशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात करण्यात येईल असा धमकीवजा इशारा भाजपकडून शिवसेनेला देण्यात येत आहे.