मुंबई : जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्यात बदल करा, नारायण राणेंपासून संरक्षण द्या, अशा मागण्या करत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते उरले नसताना सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष बदलून काय उपयोग? अशा संतप्त प्रतिक्रीया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये उमटल्या आहेत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सांगितले म्हणून शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त केल्या. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांच्या नियुक्तीचे पत्रक काढले. सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत. भाई सावंत हे शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. विकास सावंत यांनी कोकणातील काँग्रेसवासीयांचे गा-हाणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मांडले होते. राणे आम्हाला संपवायला निघाले आहेत. मूळ निष्ठावंतांकडे लक्ष द्या, असे सांगणाºया सावंत यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे काही जण वैतागून शिवसेनेत गेले, काही पक्ष सोडून घरी बसले. ज्यांनी राणे यांच्याशी यांच्याशी जुळवून घेतले ते त्यांच्यासोबत गेले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते नाहीत, असेही हा नेता म्हणाला.रत्नागिरीत निलेश राणे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे होते, त्यासाठी राणे यांनी सतत पाठपुरावा केला. पण त्यावेळी अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. हाच राग निलेश राणे यांनी सोशल मीडीयातून काढला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी म्हणून हुसेन दलवाई आणि राजन भोसले यांना पाठवले. त्यावेळी भाई जगताप यांना पाठवले नाही. तेथे नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन गदारोळ केला. त्यांनीच याच्या बातम्या सोशल मीडियातही टाकल्या.राणे मोठ्या समर्थकांसह आता भाजपाच्या वाटेवर असल्याने कोकणात खरा संघर्ष शिवसेना विरुध्द भाजपा असा रंगेल आणि या सगळ्यात काँग्रेस चौथ्या नंबरवर जाईल असे चित्र कोकणात निर्माण झाले आहे.
कोकणात काँग्रेसमध्ये धूमशान! सिंधुदुर्गची कार्यकारिणी बरखास्त, पक्ष संपत आल्यावर जिल्हाध्यक्ष बदलल्याचा आरोप
By अतुल कुलकर्णी | Published: September 17, 2017 2:48 AM