मुंबई - विकृत कुणाल कामरा याने उबाठाची सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवमानजनक गाणे केले. कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीकडून पैसे देण्यात आले. संजय राऊत आणि उबाठाच्या सांगण्यावरुन कामराने विकृत गाणे केले असा दावा शिंदेसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.
कुणाल कामरा हा काँग्रेस पक्षाचा एक भाग असून त्याचे राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संबंध आहेत असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरूपम म्हणाले की, कुणाल कामराने संविधानातील भाषा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. स्टॅंडअप कॉमेडिअन म्हणून शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कलाकृती नाही तर विकृती आहे. अशा विकृत माणसाला आता शिवसैनिक धडा शिकवणारच. २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केला. या उठावाला लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्वीकारले आणि शिवसेनेला भरभरुन मतदान केले असं त्यांनी सांगितले.
तसेच कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे. कामरा हा डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता असून तो काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग बनला आहे. कामरा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी कामरा याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून पैसे घेऊन अशा प्रकारची राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचे काम कामरा करतोय. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करण्यासाठी उबाठाकडून पैसे देण्यात आल्याचा संशय संजय निरुपम यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामी करणारे गाणं ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले त्यासाठी मातोश्रीवरुन कामराला पैसे देण्यात आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरुनच कामराने उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली असा आरोप निरूपम यांनी केला.