कॉमेडीयन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या विडंबन गीतामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. या कामराने केलेल्या विडंबनानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या शोचं चित्रिकरण होत असलेल्या सेटची मोडतोड केली. तसेच कुणाल कामराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुणाल कामराचं समर्थन करण्यात आलं असून, त्याने माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी केलं आहे.
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन करताना अंबादास दानवे म्हणाले की, कुणाल कामरा यांची भूमिका चुकीची नाही. आम्ही तिचं समर्थन केलंय. तसेच आता पुन्हा एकदा त्याचं समर्थन करतो. त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तसेच त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. ठाण्यात रिक्षा एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोकं आहेत. कुणीही असू शकतं, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही कुणाल कामरा याचं समर्थन केलं आहे. "कुणाल कामराने काहीही चुकीचं केलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं हा देशद्रोह असतो का? आपण औरंगजेबाला तसंच म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. या लोकांनी नवीन शब्दकोश तयार केला असेल तर तसं सांगावं, असे संजय राऊत म्हणाले.