ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 24 - चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाणारे भारतीय हवाईनदलाचे विमान शुक्रवारी बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाले. त्या विमानातील २९ जणांमध्ये निगडीतील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुणाचा समावेश असून विमान बेपत्ता झाल्याची बातमी कानी पडल्यापासून कुणालचे आई, वडील, भाऊ, नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या, इंटरनेटवर यावरून काही माहिती मिळते का ? कुणाल सुखरूप आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचा जीव कासावीस झाला आहे. ते सातत्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.निगडी, प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीत राहणारे बारपट्टे कुटुंबीय,राजेंद्र आणि विद्या बारपट्टे या दांपत्याचा २८ वर्षाचा मुलगा कुणाल बेपत्ता झालेल्या विमानात नेव्हीगेटर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी विमान बेपत्ता होण्याची घटना घडली. रविवारी तिसरा दिवस उजाडला. संरक्षण खात्यातर्फे शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असूनही विमानाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कुणालच्या कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली आहे. पहिल्यापासून आवड असल्याने कुणाल हवाई दलात २००८ ला रुजू झाला. त्याचा लहान भाऊ सत्येंद्र आॅस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत आहे. विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यापासून सत्येंद्रसुद्धा सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कुणाल यांचे मामा दिनेश पाटील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
'त्या' बेपत्ता विमानात निगडीतला कुणाल
By admin | Published: July 24, 2016 4:45 PM