सुधीर महाजन, औरंगाबादजिल्हा परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला असून, पुढच्या पाच-पंचवीस वर्षांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे स्पष्ट संकेत दिले. लातुरात भाजप स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता राबविणार. येथील काँग्रेसची परंपरागत जहागीरच खालसा झाली. हे उदाहरण राजकारणाची दिशा देण्यासाठी पुरेसे आहे. परंपरागत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर गेले; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईनंतर उर्वरित महाराष्ट्रात पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठवाडा काबीज केला होता आणि मराठवाड्याच्या मातीत ती फोफावली, त्याचे कारण तिचा हिंदुत्वाचा बाज आणि पोलीस अॅक्शननंतर मराठवाड्याची बनलेली मानसिकता; पण या निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा विचार करता हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एकीकडे मुस्लिम इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) हा पक्ष अस्तित्व दाखवत असताना शिवसेनेची पीछेहाट या पक्षाला विचार करायला लावणारी आहे.मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदांतील ४६० जागांचा विचार केला तर सर्वात जास्त १३२ जागा भाजपने पटकावल्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने ११७ जागा जिंकून दुसरा क्रमांक गाठला. काँग्रेस ९८ जागांवर तिसऱ्या, तर शिवसेना ८७ जागा जिंकून चौथ्या स्थानावर फेकली गेली. यापूर्वीच्या निवडणुकीत हिंगोली जि.प. ची सत्ता शिवसेनेने स्वबळावर मिळवली होती. यावरून सेनेच्या या गडाची किती मोठ्या प्रमाणावर पडझड झाली हे दिसते. गड राखण्यासाठी त्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागते, मजबुतीकरण करावे लागते. किल्लेदारांच्या बदल्या केल्या की नवे किल्लेदार जोमाने काम करतात; पण शिवसेनेने मराठवाड्याच्या गडाकडे फारसे लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण अजून थांबत नाही. पराभवाच्या फटक्यांनी जागे होण्यापेक्षा हा पक्ष बधिर होत चालला असे चित्र आहे. तिसऱ्या स्थानावर पक्ष असला तरी तो राष्ट्रवादीसोबत तीन ठिकाणी सत्तेवर येऊ शकतो. या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी ठीक राहिल्याचे दिसले. भाजपपाठोपाठ त्यांची ताकद दिसून आली. मराठवाड्यात औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याचेही बुरूज ढासळले.
मराठवाड्यात भाजपाची सेनेवर कुरघोडी
By admin | Published: February 25, 2017 1:07 AM