पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यासाठी वापरण्यात आलेले तीन हातोडे आणि एक कुऱ्हाड नदीपात्रामधून जप्त करण्यात आली. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी गडकरींचा पुतळाही मिळाला होता. मात्र, तेव्हा ही हत्यारे दोन तास शोध घेऊनही कशी मिळाली नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान चारही कार्यकर्त्यांची न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी राणोजी बिल्डिंग, नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदुस, रौंदळवस्ती, ता. खेड) अशी अटक कार्यकर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी उद्यानप्रमुख अशोक घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील मुख्य सू्त्रधाराचा शोध घेण्यासाठी तसेच अधिक तपासासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी विशेष सहायक सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. मिलिंद पवार, अॅड. रविराज पवार, अॅड. सुहास फराडे, अॅड. विजय शिंदे, अॅड. विश्वजित पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
नदीतून काढली कुऱ्हाड, ३ हातोडे
By admin | Published: January 07, 2017 12:56 AM