नागपूर, दि. 11-नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या कुश कटारिया हत्येतील दोषी आयुष पुगलियाची कारागृहात हत्या करण्यात आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या आपापसातील वादातून आयुष पुगलियाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समजतं आहे. तुरुंगातील दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे त्यामुळे तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आयुषचं त्याच्यासोबत असणाऱ्या एका कैद्याबरोबर सकाळी भांडण झालं होतं. हे भांडण विकोपाला गेलं आणि आयुषची हत्या झाली आहे. आयुषच्या डोक्यात फरशी मारून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, मृतक आरोपीचे भाऊ नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर निषेध म्हणून बसले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं खंडणी, अपहरण आणि खून प्रकरणी दोषी ठरवलेला पुगलिया तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तुरुंग प्रशासनानं धंतोली पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला आरोपी सुरज विशेषराव कोटनाके याने आयुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुरज कोटनाके हा चंद्रपुरातील राजोराचा राहणारा आहे. सुरजने 2014 मध्ये एकाची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी 2015 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आयुष आणि सुरजमध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्या भांडणाचा आज उद्रेक होऊन हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
कुश कटारियाची हत्या नेमकी कशी झाली? ८ वर्षांचा मुलगा कुश कटारिया याचं ११ ऑक्टोबर २०११ रोजी घरातून अपहरण झालं होतं. कुश हा शुभम बैद व रिद्म पुरिया या दोन मित्रांसोबत घरात खेळत होता. दरम्यान, आरोपी आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला स्वत:कडे बोलावलं होतं. कुणालाही दिसू नये म्हणून तो कुश गॅलरीतून खाली उतरतपर्यंत पुढे निघून गेला. कुश त्याच्या मागे धावत आला. यानंतर आयुष कुशला दुचाकीवर बसवून परिसरातून निघून गेला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्याने खंडणीसाठी कटारियांच्या घरी दूरध्वनी केला. ‘दोन कोटी रुपये द्या अन्यथा कुशला ठार मारेन, पोलिसांना माहिती दिल्यास खबरदार’, अशी धमकी त्याने दिली. कुशचे अपहरण झाल्याचे पुढे आल्यावर गुन्हे शाखा पोलिसांसह संपूर्ण यंत्रणेने कुशचा शोध घेतला, पण काहीच फायदा झाला नाही. कुश आयुषच्या मागे गेला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर आयुषला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आयुषने हत्येची कबुली दिली. आयुषने कुशची सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन अत्यंत निर्घृण हत्या केली होती. आयुषने आधी कुशच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केला. कुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावर आरोपीने कटरने कुशचा गळा कापला. यानंतर तो कुशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून घटनास्थळावरून निघून गेला.