मुंबई - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार २०१९' ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये , सन्मानपत्र आहे. या पुरस्काराचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी , कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी नाशिक येथे समारंभात प्रदान करण्यात येईल.
यशवंत चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर , विलास खोल व रेखा इनामदार यांनी एकमताने डहाके यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. जनस्थान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष असून दोन वर्षांनी एकदा या पुरस्कार दिला जातो. या पूर्वी , विजया राजाध्यक्ष, अरुण साधू , भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत , विजय तेंडुलकर अशा दिग्गजाना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.'योगभ्रष्ट', 'शुभवर्तमान', 'शुन:शेष' , 'चित्रलिपी', 'वाचाभंग' हे काव्यसंग्रह, 'अधोलोक', 'प्रतिबद्ध' आणि 'मर्त्य' या कादंबऱ्या तर यात्रा-अंतयात्रा व मालटेकडीवरून हे लेख संग्रह, साहित्य आणि दृश्यकला यांसारखे समीक्षात्मक लेखन डहाके यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मराठी साहित्यातील कोश वाडमयात त्यांनी मोलाची भर घातली आहे. १९६६ साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. “चित्रलिपी” या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कृतज्ञतापूर्वक स्वीकारसाहित्य क्षेत्रात कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित होणे ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील हा महत्वाचा पुरस्कार आहे. त्यामुळे या सन्मानाचा कृतज्ञ भावनेने स्वीकार करत आहे. - वसंत आबाजी डहाके