ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर दि. ११ : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट) कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सारे नियोजन अतिशय चांगले झाले आहे. अशीच सज्जता व सक्षमत: संपुर्ण महापर्वाच्या 13 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक पर्वणीच्यावेळी ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भक्त निवासात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, प्रांताधिकारी अश्विनी जिंरगे, एनडीआरएफचे वाय. ओ. नारंग, तहसिलदार सचिन गिरी, सरपंच अरुंधती जगदाळे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृसिंहवाडी, शिरोळ, गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणी कन्यागत महासोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम होणार असून, पर्वणी काळासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पध्दतीने तयार असल्याचे प्रतिपादन करुन डॉ. अमित सैनी यांनी वारणा, पंचगंगा, कोयना या धारणांमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. अलमट्टीच्या पाण्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असेही डॉ. सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्वणीच्या दिवशी दोन, तीन फुटाने पाणी कमी झाले तरी, घाटांच्या ठिकाणी स्नानाची संधी उपलब्ध करुन देता यईल, असे सांगून त्यांनी चेंजिंग रुप दर्जेदार असावे, यासाठी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर शुक्लतीर्थ आणि पापविनाशीतीर्थ येथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था होऊ शकते. घाट तातडीने स्वच्छ करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाळ 13 महिने चालू राहणार असून हा सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल व दर्जेदार उत्सव संपन्न होईल. येणार सर्व लोक आपले पाहुणे आहेत या भुमिकेतून प्रशासकी यंत्रणेबरोबरच स्थानिकांनीही आपली अतिथ्यशीलतेची परंपरा जपावी एकमेकांच्या हात हात घालून हा उत्सव व्यवस्थीतपणे पार पाडू. पाणी कमी किंवा जास्त झाले तरी कन्यागत महापर्वकाळ अतिशय चांगला पार पडेल असा विश्वास व्यक्त केला.
एन.डी.आर.एफ.चे वाय.ओ. नारंग यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अतिशय नियोजनबध्द असल्याचे सांगून आपत्तीच्या काळात मदतीसाठी एनडीआरएफच्या 20 तज्ञ जवानांचे पथक तीन बोटींसह सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच अरुंधती जगदाळे, शशिकांत पुजारी यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि आमदार उल्हास पाटील यांनी गणेशवाडी, शुक्लतीर्थ, औरवाड, नृसिंहवाडी येथील मंदिराचे मुख्य घाट, पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था, निवारा शेड आदीसर्व ठिकाणांची पाहणी केली. शुक्लतीर्थाच्या ठिकाणी दोन अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे सांगितले. गणेशवाडी येथे घाटांवर पाणी कमी असल्याने स्नानाची व्यवस्था या ठिकाणी अतिशय चांगली होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होईल यासाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र युनिट ठेवावे, दोन बोटी ठेवाव्यात, वैद्यकीय पथक ठेवावे, अग्नीशमन यंत्रणा ठेवावी अशा सूचना दिल्या. पर्वणी काळात गणेशवाडी, खिद्रापूर, शिरोळ, औरवाड आणि नृसिंहवाडी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय असला पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.