ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करून आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. सहाय्यक कामगार आयुक्त महत्त्वाच्या बैठकीच्य वेळी गैरहजर राहात असल्यामुळे वैतागलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनातील खूर्चीला साडी, चोळी, गजरा आणि बांगड्यांचा आहेर देऊन त्यांचा निषेध केला.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला वाढीव महागाई भत्ता व त्याअनुषंगाने वेतनवाढ मिळवून देण्यासाठी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त पी. आर. देशमुख यांना विनंती केली होती. यासंदर्भात १८ जुलै रोजी बैठक लावण्यात आली होती. यावेळी यंत्रमागधारक संघ आणि कामगार संघटनांमध्ये ५० टक्के रक्कम देण्यावर समझोता झाला होता. या विषयासंदर्भात २१ जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित केली होती; पण या महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी ते गैरहजर राहिले. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. चिडलेल्या कामगारांनी दुकानातून जवळच्या दुकानातून साडी, चोळी, गजरा आदी वस्तू आणून त्यांच्या दालनातील खूर्चीला या वस्तूंचा आहेर केला. यावेळी आयुक्तांच्या विरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. जेलरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही घोषणाबाजी पाहून सहाय्यक कामगार आयुक्तांना दूरध्वनी केला. आयुक्ताकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे कामगार शांत झाले. आता ही बैठक २५ जुलै रोजी होणार आहे.