मुंबई : म्युनिसिपल मजदूर युनियनचे माजी कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते दिगंबर सातव (वय ८६ वर्षे) यांचे नुकतेच पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व जावई, नातवंडे असा परिवार आहे.राष्ट्र सेवा दलाच्या जडणघडणीत तयार झालेले दिगंबर सातव पुढे समाजवादी व कामगार चळवळीत जोडले गेले. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, बाळ दंडवते, शरद राव, महाबळ शेट्टी यांच्यासमवेत मुंबईत महापालिका कामगारांची म्युनिसिपल मजदूर युनियन ही संघटना उभी करण्यात आणि वाढवण्यात मोठा वाटा होता. ते महापालिकेतील सफाई कामगारांचे अनेक वर्षे नेतृतत्व करीत होते. याशिवाय पीडब्ल्यूडी मजदूर युनियन व हाउसिंग बोर्ड मजदूर या दोन्ही संघटनांचे संस्थापक तसेच सरचिटणीस होेते. जकातीच्या प्रश्नावर राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांतील कर्मचारी संघटनांची जी फेडरेशन उभी राहिली, त्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. मुंबईतील सफाई कामगारांच्या नोकरीतील अनावश्यक व अडचणीच्या अटी दूर करणे, त्यांना घरे मिळवून देणे, मृत सफाई कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तीला पालिकेत नोकरी मिळवून देणे, तसेच त्यांना कायम करणे आणि सफाई खात्यातील रोजंदारीवरील कामगारांना बोनस दिला जावा, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. कामगारांची प्रशिक्षण शिबिरे भरवण्यात आणि तरुण कामगारांना कायद्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. महापालिका, हाउसिंग बोर्ड तसेच पीडब्ल्यूडी खात्यातील कामगारांना आणि विशेषत: सफाई कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडणारा आणि त्यांचे प्रश्न सोडवणारा एक ज्येष्ठ सहकारी आपण गमावला आहे, या शब्दांत म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनी दिगंबर सातव यांना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)
कामगार नेते दिगंबर सातव यांचे निधन
By admin | Published: February 26, 2017 1:49 AM