बेळगाव : कृषी, उत्पादन आणि सेवा ही तीन क्षेत्रे बलवान झाली, तर देशाचा विकास निश्चित होईल. त्या दृष्टीने भविष्यात शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड (स्वॉइल हेल्थ कार्ड) योजना राबविण्यात येणार आहे. २०१७ मध्ये देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे हे कार्ड असेल आणि त्याद्वारे आपल्या जमिनीचा कस काय आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालाद्वारे समजू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.येथील सावगाव रोडवरील अंगडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. प्रारंभी मोदी यांनी किसान पीक विमा योजनेचा प्रारंभ भाताला सुपाद्वारे वारे देऊन केला. या मेळाव्यास उत्तर कर्नाटकमधून एक लाखाहून अधिक शेतकरी उपस्थित होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा केंद्रीय मंत्री अनंतकुमार, सदानंद गौडा, केंद्रीय राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश, कर्नाटक भाजपचे प्रभारी पी. मुरलीधर राव, ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा, जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, बेळगावचे खासदार सुरेश अंगडी उपस्थित होते.‘कमी पाण्यातही चांगली शेती करता येते, हे शेतकऱ्यांंनी समजून घ्यायला पाहिजे. सूक्ष्म जल सिंचनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. पाणी आणि जमिनीची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. ‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ ही मानसिकता रुजायला पाहिजे,’ असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी ५० हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. नदी जोडणी प्रकल्प देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी राजकारण आणि आपसातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या सरकारने विविध योजना राबविलेल्या आहेत आणि भविष्यातही राबविणार आहे. आयटी क्षेत्रातील संशोधकांनी शेतीतील संशोधनाकडे लक्ष्य द्यावे. नव्या संशोधनामुळेच कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे.’‘१८ महिन्यांपूर्वी आमचे सरकार सत्तेवर आले. त्या वेळी सगळ्या क्षेत्रांत केवळ भ्रष्टाचार ऐकायला येत होता. जागतिक स्तरावर भारताची पत घसरली होती. भारताला कोणत्याही बाबतीत इतर देश गणतीत घेत नव्हते. देश आर्थिक संकटात होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. १८ महिन्यांत आमच्या सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. कोणीही खोटा आरोप करायचे धाडस केले नाही.’‘आज सर्वत्र भारताच्या विकासाचा गौरव केला जातोय. हा बदल केवळ १८ महिन्यांत घडला,’ असेही मोदी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जमिनीचा कस शेतकऱ्यास प्रयोगशाळेतून कळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 4:25 AM