पुणे : ’हार्ट फेल्युअर’ हा एक प्रगतीशील आजार आहे. शरीरात रक्त पंप करण्याची क्षमता त्यामुळे बाधित होते. लोक अनेकदा हार्ट फेल्युअरच्या लक्षणांना वृद्धत्वाच्या लक्षणांशी जोडतात आणि आजार बळावल्यावर निदान करतात. हा असा आजार आहे, ज्याचे निदान खूप कमी होते आणि तो रूग्णांना गुपचूप आणि वेगाने ठार करू शकतो. भारतात हृदयविकारांबाबत आणि विशेषत: हार्ट फेल्युअरबाबत एकूणच जागरूकता खूप कमी असल्याचे निरीक्षण वैद्यकीय वैद्यकीय तज्ञांनी नोंदविले आहे. ‘हार्ट फेल्युअर’ ही एक गंभीर आणि कधीही बरी न होणारी स्थिती असून, वेळेत निदान आणि उपचार झाल्यास रूग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी होऊन रूग्णांचे जीवनमान वाढू शकते. हार्ट फेल्युअर विविध कारणांनी होऊ शकते. त्यात इसशेमिक हार्ट डिसीज,कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी), हार्ट अॅटक , उच्च रक्तदाब, हार्ट व्हॉल्व्ह डिसीज, कार्डिओमायोपथी, फुफ्फुसांचा आजार, मधुमेह, लठ्ठपणा, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन तसेच हृदय विकारांचा कौटुंबिक इतिहास यांचा समावेश आहे. अनेक लोक हार्ट फेल्युअरच्या लक्षणांना जसे श्वास कमी पडणे, थकवा, घोटे, पाय किंवा पोटाला सूज, अनपेक्षित वजनवाढ किंवा रात्रीच्या वेळी सतत लघवीला जावे लागणे अशी लक्षणे वृद्धत्व किंवा इतर कोणत्याही आजाराशी चुकीच्या पद्धतीने जोडतात. यामुळे निदान विलंबाने होते आणि रूग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे या लक्षणांकडे नीट लक्ष देणे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांसाठी नियमित उपचार करून घेणे आवश्यक आहे, याकडे तज्ञांनी लक्ष वेधले आहे. -----------------------------------------------------------हार्ट फेल्युअर कशामुळे होते? हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे रक्तपुरवठा कार्यक्षमतेने होत नाही आणि व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन व पोषणाच्या गरजा पूर्ण होत नाहीत. ------------------------------------------------------------भारतात हार्ट फेल्युअरचे प्रमाण:* भारतात सुमारे ८-१० दशलक्ष हार्ट फेल्युअरचे रूग्ण * हार्ट फेल्युअरचे २३% रूग्ण निदानापासून एका वर्षात मरण पावतात. * १/३ हार्ट फेल्युअरचे रूग्ण उपचाराच्या ६ महिन्यांत रूग्णालयात मरण पावतात. ----------------------------------------------------------- दररोज किमान दोन हार्ट फेल्युअरचे रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतात. यातील बहुसंख्य रुग्णांमध्ये आजार विकोपाला गेलेला असतो. या पार्श्वभूमीवर या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यावश्यक आहे. लवकर उपचार मिळाल्यास वारंवार रुग्णालयात दाखल होणे कमी होऊ शकते आणि रुग्णाचे आयुर्मानही वाढू शकते. या रुग्णांपैकी बहुतेकांमधील विकार अधिक चांगली तपासणी व धोकादायक घटकांवर वेळेत तसेच योग्य उपचार मिळाल्यास बरा होऊ शकतो- डॉ. शिरीष हिरेमठ, माजी अध्यक्ष, कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया आणि कँथ लँब संचालक, रूबी हॉल क्लिनिक------------------------------------------------------------