नागपूर : आपल्या देशात ‘पीएच.डी.’ घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु बहुतांश ठिकाणी केवळ जुन्या गोष्टींमध्ये फेरफार करूनच संशोधन केल्याचे दावे करण्यात येतात. अशा संशोधनात दर्जाचा अभाव असतो. वर्तमान ज्ञानात उपयुक्त भर घालणे म्हणजे संशोधन आणि ‘पीएच.डी.’ करणाऱ्यांकडून हेच अभिप्रेत आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘व्हीएनआयटी’त ‘संशोधनातून पुनरुत्थान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान ‘संशोधन आणि नवोन्मेष’ या विषयावर त्यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले. या वेळी प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य व भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष सत्यवान मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिक्षणातून एकच शाखा नव्हे, तर विविध बाबींचे ज्ञान व्हायला हवे. सर्वस्पर्शी शिक्षणाची समाजाला आवश्यकता असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, संशोधनामुळेच एखाद्या वस्तूला किंमत येते व संशोधनामुळेच अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकेल. पर्यावरणाशी संबंधित संशोधनामध्ये समाजाचा सहभाग असण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. चितळे यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी विदेशातील संशोधनाबाबत माहिती दिली.
‘पीएच.डी.’च्या संशोधनात दर्जाचा अभाव
By admin | Published: February 13, 2016 11:43 PM