संतोष वानखडे / वाशिम
शौचालय बांधकाम आणि स्वच्छतागृहाचा सर्वत्र गजर सुरू असतानाच, शासनाच्या राज्यभरातील २३ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहच नसल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. पिण्याच्या पाण्याची सुविधा, संरक्षण भिंत, संगणक, वीजजोडणी, मुलींसाठी स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधा सर्व शिक्षा अभियानातून गत चार-पाच वर्षांपासून उपलब्ध केली जात आहे. तरीदेखील राज्यभरातील २३ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याची परिस्थिती आहे. २0११-१२ मध्ये ७१.५ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह होते. २0१२-१३ मध्ये ७५ टक्के तर २0१३-१४ या सत्रात ७७ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत मात्र समाधानकारक चित्र आहे. २0१३-१४ या सत्रात राज्यभरातील ९८.४ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध असल्याचे सर्व शिक्षा अभियानाची आकडेवारी सांगते. ६८.३ टक्के शाळांना संरक्षण भिंतीची सुविधा आहे तर ४७.४ टक्के शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २0१३-१४ या सत्रात राज्यभरातील ८५ टक्के शाळांमध्ये वीजजोडणी पोहोचली असल्याचेही समाधानकारक चित्र आहे. २0११-१२ मध्ये केवळ ७४ टक्के शाळांमध्ये वीजजोडणी पोहोचली होती. शासनाच्या प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्याची ग्वाही शासनाने दिलेली असतानाही, २0१३-१४ या सत्रापर्यंत २३ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याची परिस्थिती आहे.