मुंबई : मराठी साहित्यात वन्यजिवांविषयीही पुरेसे लेखन झालेले नाही, अशी खंत वन्यजीवविषयक ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात रविवारी सुधीर महाबळ लिखित ‘परतवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘कित्येक लेखकांनी वारी या विषयावर लेखन केले आहे. परंतु कोणत्याच लेखकाने परतवारी हा विषय हाताळला नाही. सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ पुस्तकाच्या रूपाने त्याबद्दलचे अपूर्ण साहित्य पूर्ण केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, मराठी साहित्यात वन्यजीव, जलचर, झाडे आणि फुलांबद्दल खोलवर लिहिण्यात आलेले नाही. ही कमतरता भरून निघण्यासाठी नव्या पिढीने लिहिते होण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. रवीन थत्ते म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने मला ‘वैभव वारी’ आणि ‘वैराग्य वारी’ असे दोन नवे शब्द आणि त्यांचा अर्थ समजला. परतवारी ही एखाद्या बखरीप्रमाणे आहे. शरद काळे म्हणाले, ‘पुण्य नसलेल्या’ परतीच्या वारीवर खूप सुंदर लेखन सुधीर महाबळ यांनी केले आहे. वारकऱ्याच्या घरात जन्माला येऊनही सुधीरने पायवारी करायला थोडा उशीरच केला. परंतु परतीची वारी गेली १६ वर्षे ते अक्षरश: जगत असल्याने त्यांना हे पुस्तक लिहिता आले. लेखक सुधीर महाबळ म्हणाले, ‘वारीला जातानाचा प्रवास हा २१ दिवसांचा असतो. तोच प्रवास येताना १० दिवसांत पूर्ण करायचा असतो. मी २००६ सालापासून परतवारी करत आहे. या प्रवासात आलेले अनुभव, छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळालेले धडे, माणसांमधला स्वार्थ आणि परमार्थ, परतवारीदरम्यान भेटलेल्या व्यक्ती आणि प्रसंग या सगळ्यांना एकत्र गुंफून हे पुस्तक लिहिले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अध्यक्ष अरविंद पाटकर, शरद काळे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू, अच्युत गोडबोले, दीपा देशमुख आणि डॉ. मनीषा फडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठी साहित्यात वन्यजिवांविषयी लेखनाचा अभाव
By admin | Published: March 07, 2017 2:04 AM