ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरुमध्ये मोठया प्रमाणावर महिलांचा विनयभंग, छेडछाडीच्या घटना घडल्या. त्यावर बोलताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. विनयभंगाच्या घटनांसाठी आझमी यांनी महिलांनाचं जबाबदार धरले आहे.
भारतीय संस्कृती, परंपरांपासून दूर गेल्यामुळे हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. जे घडले ते खेदजनक आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुला-मुलींच्या एकत्र बाहेर जाण्यावर आपण काही बोललो तर आपल्याला जुनाट विचारसरणीचे ठरवले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये काही मर्यादा आहेत.
सध्याच्या दिवसांमध्ये तोकडे कपडे घालणा-या महिलांना फॅशनेबल, आधुनिक आणि सुशिक्षित ठरवले जाते. आपल्या देशात हे प्रमाण वाढत आहे असे आझमी म्हणाले. आझमी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याचीही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत.
31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला.