लोकमत न्यूज नेटवर्क, भातसानगर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात विरोधक अफवा पसरवत असून, ही योजना कधीही बंद होणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी केले. अशा वर्कर व महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांच्या कामासंदर्भात त्यांनी गौरवोद्गार काढले.
महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कायापालट लोकसंचालित साधन केंद्र आणि अजित पवार गटाच्या वतीने शहापूरमध्ये महिला संवाद मेळावा झाला. यावेळी आमदार दौलत दरोडा, आनंद परांजपे उपस्थित होते. बचत गटांतील महिला तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
पहिला हप्ता शनिवारी
ठाणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना पहिला हप्त्याचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे १७ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी देण्यात येणार आहे. केंद्राकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. एक लाख १४ हजार महिलांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.