मुंबई : लाडकी बहीण योजना गेमचेंजर बनली आहे. आता विरोधक म्हणताहेत की, आमचे सरकार आले तर महायुतीने सुरू केलेल्या सर्व योजना बंद करू. पण, लाडकी बहीण योजनेसह आम्ही घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांना हात लावाल तर तुमचाच कार्यक्रम होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विरोधकांना दिला.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्र परिषद येथे झाली. यावेळी शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सांगावे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. तिन्ही नेत्यांनी यावेळी महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांची यादी पत्रकारांना दिली. आम्ही केलेली विकासकामेच महायुतीला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाहीत. ते ‘सीएम-सीएम’ करत आहेत तर आम्ही ‘काम-काम’ करत आहोत. राज्यातील जनतेला ‘कॉमन मॅन’ न ठेवता त्याला आम्हाला ‘सुपरमॅन’ करायचे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
‘जरांगे-पाटील यांनी समजून घ्यावे’- मराठा समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. आम्ही काय केले ते मनोज जरांगे -पाटील यांनी नीट समजून घ्यावे आणि जे आज बोलतात, त्यांनी मराठा समाजासाठी काय केले तेही समजून घ्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. देणारे कोण, फसविणारे कोण याचा विचार जरांगे-पाटील यांनी करावा, असेही ते म्हणाले.- ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, हा शब्द मी दिला होता. १० टक्के आरक्षण आम्ही दिले. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे मिळत नव्हती, ती मिळायला लागली, असेही ते म्हणाले.
‘लाडकी बहीण’ची रक्कम वाढविणारलाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही. त्यासाठी ४५ हजार कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ही रक्कम वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचा विचार करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
जागावाटप अंतिम टप्प्यात महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, या प्रश्नावर मुख्यमंत्री स्वत: इथे बसले आहेत. शरद पवारांना माझे आव्हान आहे की, त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जागावाटप आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे ते लवकरच जाहीर करण्यात येईल.महाराष्ट्रात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक येते आणि तरीही गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करतात. खरे तर महाविकास आघाडी हीच गुजरातची ब्रँड ॲम्बेसिडर आहे का, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.